आशिष शेलारांना धमकी; देवेंद्र फडणवीस-मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे (BJP) प्रमुख नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी (Life Threat Phone call) देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती.

आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती, अशी माहिती आहे. लार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील, असं देखील कळतंय.

फोनवरून धमकी देणारी व्यक्ती ही अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष शेलार सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजप आमदार श्री आशिष जी शेलार यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त नुकतेच मीडियावर बघितले. धमकी देणारे आरोपी तात्काळ शोधल्या गेलेच पाहिजे व त्यांना अटकही झाली पाहीजे.मात्र श्री देवेंद्रजी फडणवीस यांना यातही राजकारण दिसत असेल तर हे दुर्दैवी आहे.