Ketaki Chitale | दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला बर्गर आणि आम्ही सामान्य मात्र उपाशी! केतकी चितळे पुणे पोलिसांवर भडकली!

Ketaki Chitale | कल्याणी नगर अपघात प्रकरण दिवसेंदिवस हे प्रकरण जास्तच चिघळत चालले आहे. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या पित्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आता अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केतकी चितळेने पुण्यात घडलेल्या या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. एक व्हिडीओ शेअर करून तिने आपला राग शब्दांत व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकी चितळे म्हणाली की, ‘रात्री अडीच वाजताच्या सुमारास अल्पवयीन आरोपी पबमधून निघाला आणि ३च्या सुमारास रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये अश्विनी व अनिश या दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मृत व्यक्तींचे मित्रमैत्रीण पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांनाच जाब विचारण्यात आला. या सगळ्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न केला गेला.’

पुढे केतकी म्हणाली की, ‘पण या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले होते. यामुळे पोलिसांचा हा प्रयत्न फसला.’ काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात पुणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे हिला देखील अटक केली होती. या दरम्यान आपल्याला कशी वागणूक मिळाली यावर देखील केतकी चितळे हिने भाष्य केलं. यावर बोलताना केतकी म्हणाली की, ‘मला भूक लागली तर, पोलिसांनी उत्तर दिलं की, इथे आसपास वडापावचं दुकान नाही आणि मला उपाशी ठेवलं. मात्र, एका गंभीर प्रकरणात अटकेत असलेल्या या बिल्डरपुत्राला रात्री साडेतीन वाजता बर्गर मिळावा म्हणून पोलीस प्रयत्न करतात.’

‘तो मुलगा तिथेही बसून आरामात खात आहे. त्याचे सगळे लाड पुरवले जात आहेत. अशा लाडावलेल्या बाळांना बर्गर दिला जातो आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना मात्र उपाशी ठेवलं जातं’, असं म्हणत केतकी चितळे हिने आपला संताप व्यक्त केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप