G-20 शिखर परिषदेपूर्वी दिल्लीत खलिस्तानी नारे; पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषद होणार आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांच्यासह सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. या मोठ्या शिखर परिषदेपूर्वीच दिल्लीला धमक्या आल्या आहेत. खलिस्तान समर्थकांनी दिल्ली मेट्रोच्या भिंतींवर घोषणा लिहिल्या आहेत, त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. आता प्रश्न असा आहे की या खलिस्तानी घोषणा कोणत्या संघटनेने लिहिल्या आहेत आणि याचे कारण काय?

SFJ समर्थकांवर आरोप

दिल्ली पोलिसांनी आता या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) च्या लोकांनी हे काम केल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकाबाहेर अशा खलिस्तानी घोषणा पाहायला मिळाल्या. मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर दिल्ली बनेगा खलिस्तान, खलिस्तान झिंदाबाद आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात अशा घोषणा दिसल्या, ज्या दिल्ली पोलिसांनी पुसून टाकल्या.

खलिस्तान चळवळीशी संबंधित सर्व संघटनांप्रमाणे, शीख फॉर जस्टिस ही स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी संघटना आहे. ही संघटना अमेरिकेपासून कॅनडा आणि इतर काही देशांमध्ये सक्रिय आहे. ही फुटीरतावादी संघटना अमेरिकेत 2007 मध्ये सुरू झाली होती. भारतीय एजन्सीच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट असलेला गुरपतवंत सिंग पन्नू ही संस्था चालवतो.

गुरपतवंत सिंग पन्नूचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो पंजाबमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच पन्नू त्याच्या शिख फॉर जस्टिस या संस्थेच्या माध्यमातून अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधील भारतीय नेते आणि मुत्सद्दी यांच्याविरोधात द्वेष पसरवण्याचे काम करतो. भारतीय दूतावासांवर हल्ले आणि निदर्शने करण्यातही या संघटनेचा हात होता. त्यामुळेच पन्नूला अटक करण्याचे भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.