कृष्णा खोरे विकास महामंडळाचं काम मिळालं आणि अविनाश भोसले यांचं नशीबच पालटलं 

मुंबई : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी (Yes Bank-DHFL fraud case)  केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की अविनाश भोसले नेमके कोण आहेत. आणि ते एवढे श्रीमंत कसे झाले ? आज आपण याच अविनाश भोसले यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार,  अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते.पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते.

अविनाश भोसले यांनी 1979मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.अविनाश भोसले यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये (1995) कृष्णा खोरे विकास महामंडळाची (Krishna Valley Development Corporation) कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली.

पुढे जलसंपदा विभागातील प्रकल्पांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली. गेल्या 15 ते 18 वर्षांत अविनाश भोसले यांची जी वाढ झालीय, ती प्रचंड वेगानं झालीय. जिला ‘रॉकेट राईज’ (Rocket Rise) असं म्हटलं जाऊ शकतं, असं अविनाश भोसले यांचा प्रवास जवळून पाहिलेले जाणकार सांगतात.