मुख्यमंत्री शिंदेंकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्रातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा टोला

मुंबई – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि सरकारच्या अजेंड्याशी असहमत असलेल्या सर्व नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदीसरकार (Modi Government) करत असल्याचे आता स्पष्ट झाले असून स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात देशाची चूक होती का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

एखाद्या विशिष्ट सरकारी धोरणावर टीका करणे हे आपल्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारातंर्गत नाही का? पंतप्रधान मोदींचे सरकार भारत लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर उभा आहे, जिथे लोकांचा आवाज सर्वोच्च आहे, हे विसरले आहे का? असे अनेक सवाल ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सीच्या (Jack Dorsey) मुलाखतीवर भाष्य करताना महेश तपासे यांनी केले आहेत.

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मुलाखतीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या निषेधाशी संबंधित सर्वांची खाती ब्लॉक करण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला असा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर बोलताना महेश तपासे यांनी मोदी व भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात आता भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना बदलण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे ठाम मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यातील तेढ स्पष्टपणे दिसून येते आहे. आपल्या मित्रपक्षावर नेहमीच कुरघोडया करणार्‍या भाजपशी कायमचे सहजीवनाचे नाते असू शकत नाही हे शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांना कळले हे चांगले आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

भाजप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणेल अन्यथा राजकीय संन्यासाला सामोरे जायला भाग पाडेल असा पुनरुच्चार महेश तपासे यांनी पुन्हा एकदा केला आहे.