शहाजी बापूंवर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मागील विधानसभा निवडणुकीत मिळाली होती अवघी 267 मते 

पुणे : राज्यात सत्तांतर होत असताना सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजी पाटील हे चांगलेच चर्चेत होते. आता याच शहाजी पाटील यांच्यावर नव्याने शिवसेनेत दाखल झालेले  प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) विविध मुद्द्यांवरून लक्ष्य करत आहेत. मात्र पाटील यांना फक्त मीडियात येवून लक्ष्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या हाके यांना खरंच जनाधार आहे का यांची पोलखोल सरकारनामाने केली आहे.

या वृत्तानुसार, हाके यांनी 2019 मध्ये `बीव्हीेए`कडून सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांच्याविरोधात गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत यांनी शेकापकडून जोरदार आव्हान दिले होते. दोघांमध्ये मतांचा फारसा फरक नव्हता. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या शहाजी पाटलांना 99,464 तर देशमुख यांना 98,696 मते मिळाले. शहाजी पाटील हे केवळ 768 च्या मताधिक्याने विजयी झाले.

या निवडणुकीत लक्ष्मण हाके हे 19 व्या क्रमांकावर राहिले त्यांना अवघी 267 मते मिळाली. 20 व्या क्रमांकावरील उमेदवाराला 233 आणि 21 व्या क्रमांकावरील उमेदवाराला 220 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे हाके यांना स्वतःचा काहीच जनाधार नसल्याचे दिसून येते.

या मतदारसंघात शिवसेनेची हक्काची मते आहेत. त्याचा उपयोग शहाजी पाटलांना वेळोवेळी झाला. त्यामुळे हाके यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली तर उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांची ताकद त्यांच्या मागे उभे राहू शकते. मात्र तरीही त्यांना उमेदवारी मिळेल का? मिळाली तर मते मिळतील का? मते मिळाली तरी ते विजयापर्यंत पोहचतील का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील हीच अपेक्षा.