चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

Pune : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) (Kasba MLA Mukta Tilak and Chinchwad MLA Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. आज केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central Election Commission) या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं इतर पक्ष देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवणार का? की निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी अशी जनतेची इच्छा असताना देखील महाविकास आघाडीतील इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीतून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.