‘अवकाळी पाऊस व गारपीटने पिकांचे प्रचंड नुकसान, सरकारने शेतकऱ्याला सोडले वाऱ्यावर’

नागपूर –  गेल्या तीन दिवसांपासून पूर्व व पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, हरबरा, तूर, गहू, संत्रा, मोसंबी ही पिके शेतकऱ्याच्या हातातून गेली. पण शासनदरबारी अजून कोणतीच दखल घेतली गेली नाही. विदर्भातील शेतकऱ्याला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने वाऱ्यावर सोडले असा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

गारपीट होऊन तीन दिवस लोटले आहेत. पण अजून पालकमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला नाही. त्यांनी दौरा केला नाही म्हणून पंचनामे झाले नाहीत व पंचनामे करण्याचे आदेशही निघाले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे. पण नुकसानग्रस्त भागाचे दौरे करायला वेळ नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विदर्भात गारपीट झाली की नाही याची माहितीही कुणी सांगितली की नाही, याबद्दल संशयाचे वातावरण आहे.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे झालेले नुकसान पाहणे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे. नेमक्या याच वेळी शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे, असे सांगून आ. बावनकुळे म्हणाले, हे सरकार जर संवेदनशील असेल तर सरकारने सर्व पालकमंत्र्यांना ज्या भागात गारपीट व अवकाळी पाऊसाचे नुकसान झाले त्या भागाचे दौरे करण्याचे आदेश द्यावेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही अजून दौरे केले नाहीत. केवळ कार्यालयात बसून कारवाया होत नाहीत, असे सांगून आ. बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या सरकारला विदर्भाबाबत काही देणे-घेणे नाही असेच स्पष्ट दिसत आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे.