अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच बैठक घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

मुंबई :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने (Maharashtra State Anganwadi Employees Union) आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

आंदोलकांच्या शिष्टमंडळांने  मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदनतीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.