अमोल कोल्हेंविरोधात पार्थ पवार मैदानात? जाणून घ्या नेमकी का होतेय चर्चा 

Parth Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात पार्थ पवार यांनी दौरा केला. या दौ-यात पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. सोबतच स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांची देखील पार्थ पवार यांनी भेट घेतली.

अजित पवारांनी (Ajit Pawar) इशारा दिल्यानंतर थेट शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पार्थ पवार पोहचले.या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आव्हान देत शिरूर मध्ये उमेदवार देणार आणि त्याला निवडून आणणार असा इशारा दिला होता. यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पार्थ पवार ॲक्टिव्ह झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार शिरूरच्या मैदानात पाहायला मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.