‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले, शिंदे-फडणवीस यांनाही घेऊन जा, महाराष्ट्र सुखी होईल’ 

मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार सुरेश वरपुडकर, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, NSUI उपाध्यक्ष संदीप पांडे, व्हिजेएनटी विभागाचे अध्यक्ष मदन जाधव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यासमोरील संकटाकडे आणि जनतेला भेडसावणा-या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका, उडीद ही सर्वच पीके शेतक-यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने वाढवली, त्याला खते आणि कीटकनाशके यासाठी मोठा खर्चही केला होता. मात्र पीके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतक-याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतक-यांना मदतही दिली नाही.

एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारचे दुर्लक्ष अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. राज्यातील ED सरकार शेतक-यांसाठी काहीच करत नाही त्यामुळे शेतक-यांचा सरकारवर विश्वास राहिला नसून नैराश्यापोटी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. राज्यात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. ऐन दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यातील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली, ही राज्याला लाज आणणारी बाब आहे.

गेल्या तीन महिन्यात १.५४ लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन, ३ हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क, आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून राज्यातील बेरोजगारांना मिळणारे रोजगारही हिरावले गेले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. लाखो पदे रिक्त असतानाही सरकार नोकरभरती करत नाही. राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जात आहेत त्यामुळे खासगी क्षेत्रातही रोजगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राज्यातील तरुण हताश आणि निराश झाले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे शिधा वाटप करण्यात मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो त्यामुळे थेट नागरिकांच्या खात्यात रोख रक्कम ३ हजार रुपये द्यावी अशी मागणी केली होती. पण सरकारने शिधा वाटपाचा निर्णय घेतला. दिवाळी संपून गेली तरी अद्याप लोकांना आनंदाचा शिधा मिळाला नाही. काहींना शिधा मिळाला पण त्यात कुठे साखर नव्हती, कुठे तेल नव्हते तर कुठे रवा नव्हता. जे साहित्य दिले ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. या शिधा वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून लोकांची दिवाळी कडू करण्याचेच काम राज्य सरकारने केले आहे..