नगर रचनाकार पदाकरिता ‘महाराष्ट्राचा अधिवासी’ ही अट ठाकरे सरकारने वगळली; भाजप आक्रमक

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अटच वगळून टाकल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे महाराष्ट्र आणि मराठीवरील प्रेम हे निव्वळ बेगडी आहे अशी खरमरीत टीका मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

राज्यातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट वगळण्यात आली असल्यावरून आ. भातखळकर यांनी ठाकरे सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे. तसेच रोजगाराकरिता महाराष्ट्रातल्या लोकांना प्राधान्य देऊ अशा फुशारक्या मारणार्‍या सरकारने नगररचनाकारांच्या संदर्भातील 2018 सालची “उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट का वगळली या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आणि ही अट पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणली पाहिजे अशी मागणीही आ. भातखळकर यांनी केली आहे.

ठाकरे सरकारने वगळलेली अट पुनर्स्थापित केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असून त्याचबरोबर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशाराही आ. अतुल भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.