शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत, त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही – आठवले 

 मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

दरम्यान, मनसे (MNS) आणि भाजपची (BJP ) जवळीक वाढू लागल्याने केंद्रीय मंत्री अस्वस्थ झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यातूनच ते राज ठाकरेंचा जाहीरपणे विरोध करू लागले आहेत. मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार हे जातीयवादी नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

शरद पवार हे जातीयवादी नसून ते धर्मनिरपेक्ष असल्याचेही आठवले यांनी म्हटले.  शरद पवार(Sharad pawar) हे जातीयवादी नेते नाहीत. त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे श्रेय शरद पवार यांना असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. ABP माझा सोबत बोलताना त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत.