ब्रेकिंग! भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, ‘हे’ बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई: महापुरुषांवर बेताल वक्तव्य करत वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा आज सकाळी (१२ फेब्रुवारी) राष्ट्रपतींनी मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रमेश बैस (Ramesh Bais) हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. आता त्यांच्याजागी सीपी राधाकृष्णन यांना झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.