उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका!, राज्यपालांच्या पायउतारानंतर रोहित पवारांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा आज सकाळी (१२ फेब्रुवारी) मंजूर झाला असून त्यांच्याजागी रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली असून नव्या राज्यपालांना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात असे ट्विट त्यांनी केलं आहे.

“महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!”, असे ट्वीट जयंत पाटलांनी केले आहे.

“उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडी च्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.