आंदोलन आघाडीचं पण शिवसेनेचे बडे नेते काहीकेल्या आंदोलनस्थळी फिरकेनात, कारण काय ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

असं असलं तरी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र यावेळी दिसत आहे. रात्री वर्षावर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांचे दीर्घकाळ खलबत झाल्यानंतर आंदोलन करण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आज प्रत्येक्षात आंदोलन ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची हजेरी दिसत आहे. शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री आंदोलन स्थळी फिरकले नसल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचे स्प्ष्टपणे दिसत आहे. नवाब अलिक यांची केस १९९३च्या बॉम्बस्फोटशी निगडित असल्याने आणि १९९३ची ही केस शिवसेनेशी भावनिक जोडली असल्याने सेनेने या आंदोलनापासून दोन हात लांबच राहण्याचे ठरवल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिवसेनेकडून केवळ मंत्री सुभाष देसाई, आमदार यामिनी जाधव आणि सचिन आहिर हे उपस्थित आहेत. हे दोन जण वगळता शिवसेनेचा एकही बडा चेहरा या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. शिवसेनेची तोफ मानली जाणारे नेते संजय राऊत हे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह उत्तर-प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर गेलेले आहेत. तर इतर कोकणातील प्रमुख चेहरे हे भराडी देवी यात्रेला गेले आहेत. इतर कोणताही बडा नेता वा आमदार आंदोलन स्थळी दिसत नसल्याने शिवसेनेनं या आंदोलनापुरती तरी महाविकास आघाडीसोबत फारकत घेतल्याचे चित्र आहे.