विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीकडून 18 हजार कोटी वसूल केले – केंद्र सरकार

नवी दिल्ली- विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावरील खटल्याचे 18 हजार कोटी रुपये वसूल केल्याची माहिती केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. PMLA या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कायद्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची एकंदर रक्कम 67 हजार कोटी रुपये असल्याची माहिती केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली आहे.

आजवर झालेल्या 4,700 प्रकरणांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.विजय मल्ल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्यासह नीरव मोदी व मेहुल चोक्सी या तिन्ही फरार उद्योजकांकडून गैरव्यवहारांतील सर्वच्या सर्व रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असेही सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले.

तुषार मेहता म्हणाले की, 4,700 पीएमएलए प्रकरणांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात असून, गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वर्षी तपासासाठी घेतलेल्या प्रकरणांच्या संख्येत वाढ होत असल्याचे म्हटले आहे.