महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाला न्याय देणारे; नाना पटोले यांचा दावा

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा आजचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४ हजार शेतक-यांना ९६४ कोटींची कर्जमाफीही देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी इतर पर्यायांचा विचारही करण्यावर भर दिलेला आहे. महिला शेतकऱ्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शेततळ्यांसाठीचे ५० हजार रुपयांचे अनुदान आता ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये स्त्री रूग्णालये उभारण्यात येणार असून नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार आहेत. पुणे येथे इंद्रायणी मेडिसीटी उभारली जाणार असून ३०० टेलीमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. कर्करोग कर्करोग निदान वाहनांची सुविधा  शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सींग मशिन सुरु करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअपसाठी १०० कोटी रूपये निधी प्रस्तावित केला आहे.

बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन ७०० कोटी रुपये केली आहे. छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी सईबाई, श्री संत जगनाडे महाराज या महापुरुषांच्या स्मारकांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सीएनजीवरील कर १३.५ टक्यावरून कमी करून ३ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सोबतच सौर ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन ही उभारण्यात येणार आहेत.  पोलीस भरतीपूर्व तीन महिन्यांचे प्रशिक्षण देणे तसेच ३ लाख ३० हजार नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवून बेरोजगारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालयासाठी १०० कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून दोन वर्ष अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यातच गेला. राज्याच्या प्रत्येक विभागाचा विचार करुन त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. कोणताही घटक वंचित राहणार नाही याची खबरदारी या अर्थसंकल्पात घेण्यात आलेली आहे. विकासाची पंचसुत्री घेऊन आजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जणारा ठरेल. महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाला न्याय देणारे असून या सर्व घटकांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे, असे पटोले म्हणाले.