आधारस्तंभ हरपला! दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे निधन

Mahesh Babu Father Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मंगळवारी (१५ नोव्हेंबर) दु:खद बातमी पुढे आली आहे. जेष्ठ दाक्षिणात्य अभिनेते व प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचे वडील कृष्णा घट्टामनेनी (Ghattamaneni Krishna Died) यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर महेश बाबू आणि परिवारासह संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोकाची लहर पसरली आहे. २ महिन्यांपूर्वीच महेश बाबूची आई देखील देवाघरी गेली होती.

काल अचानक तब्येत बिघडल्याने कृष्णा घट्टामनेनी यांनी हैदराबादमधील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.

सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती चिंताजनक होती. महेश बाबूच्या कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता, पण नंतर हृदयद्रावक बातमी आली. ही शोकवार्ता समोर आल्यानंतर सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.