‘भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

या आरोपांवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असे शरद पवार यांनी म्हटले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्या नावाची ही उल्लेख झाल्याने खळबळ उडाली. फडणवीसांच्या आरोपानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले, आरोपांचा काही भाग समजला. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग होते ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य असल्याचे पवार यांनी म्हटले. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती. त्यावर फडणवीसांकडून तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत मी लक्ष घातलं आहे. या पुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ असं मला कळवलं गेलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी भाजपचा हा नेता कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.