खासगी कंपन्यांच्या नफ्यासाठी विद्युत मीटरचा मानवनिर्मित तुटवडा

नागपूर : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात विद्युत मीटरचा ऐतिहासिक तुटवडा (Man-made Shortage of Electric Meter) निर्माण झाला असून, खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी तो जाणीवपूर्वक निर्माण केला जात असल्याचा प्रहार राज्याचे माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

ऊर्जा मंत्रालय महावितरणच्या (MSEB) विद्युत निर्मिती कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात असून, मीटरचा तुटवडा त्याचाच एक भाग असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्यात वाढत्या तापमानामुळे विद्युत मीटरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विद्युत मीटरची मागणी देखील वाढली आहे. हे मीटर महावितरणकडून उपलब्ध होणे अपेक्षित असताना ते बाजारपेठेतून विकत घेण्यास सांगितले जात आहे. अशाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून, हा अन्याय असल्याची भूमिका आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १ हजार ५९६ रुपये घेत होती तेच मीटर आता बाहेरून विकत घेतल्यास ४ हजारांच्या घरात जाणार आहे. तर सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १ हजार ८०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. महत्वाचे म्हणजे बाजारातून मीटर विकत घेतल्यास त्याचे जोडणी शुल्क वेगळे द्यावे लागेल. आजच्या घडीला राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत तर २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही.