आपण मित्र असतो पण अशावेळी लक्षात येतं की आपण बोलायला हवं होतं; देसाईंच्या निधनानंतर मांजरेकर झाले भावूक

Nitin Desai Suicide : सिने जगतामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.

देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सिनेविश्वातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांनाही कळंत नाहीये की नितीन यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं.

मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांनी जवळच्या मित्राच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं. हे मनोरंजन विश्वाचं खूप मोठं नुकसान असल्याची प्रतिक्रिया महेश यांनी दिली. माणसाच्या डोक्यात कधी काय चालू असतं कळत नाही. नंतर वाटतं की आपण बोलायला पाहिजे होतं. आपण हल्ली बोलत नाही, मित्र म्हणून कधी फोन करत नाही. हे खूप गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, ‘मनोरंजन विश्वाचे हे खूप मोठे नुकसान झाले आहे. मला असं वाटतंय की आपण बोलत नाही, आपण मित्र असतो पण अशावेळी लक्षात येतं की आपण बोलायला हवं होतं.’