‘ठाकरे यांच्या अनेक भूमिकाही विषारी, घटनाविरोधी आहेत, तरीही ते राष्ट्रपुरुष ?’

मुंबई : राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक समतेचे कृतिशील पुरस्कर्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांना प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी साधारणत: डिसेंबरमध्ये यादी जाहीर केली जाते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राष्ट्रपुरुष व थोर पुरुषांची यादी जाहीर केली आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे व डॉ. पंजाबराव देशमुख यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वागळे या पोस्टमध्ये म्हणतात, दोन दिवसांपूर्वी ही बातमी प्रसिद्ध झाली. फारशी प्रतिक्रिया दिसली नाही. यातल्या पंजाबराव देशमुख आणि प्रबोधनकारांच्या नावाबद्दल वाद होण्याचं कारण नाही. पण बाळासाहेब ठाकरे? राष्ट्रपुरुष?

१९९३ च्या दंगलीला चिथावणी दिल्याबद्दल श्रीकृष्ण आयोगाने ठाकरेंचा स्पष्ट उल्लेख केला होता. निवडणूक आयोगाने धर्मांध प्रचाराबद्दल ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्ष काढून घेतला होता. ठाकरे यांच्या इतर अनेक भूमिकाही विषारी, घटनाविरोधी आहेत. तरीही ते राष्ट्रपुरुष ? कदाचित शिवसेनेबरोबर सत्तासोबत केल्याने कॅांग्रेस-राष्ट्रवादीने याला आक्षेप घेतला नसावा! जय सेक्युलॅरिझम! असं म्हणत वागळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.