15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात  

 मुंबई – देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या प्रतिबंधक लसीकरणाला  आजपासून सुरुवात होत आहे. 2 हजार 7 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुल या लसीकरणासाठी पात्र असतील असं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.  कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. आतापर्यंत 7 लाख लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या नियोजनासाठी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राज्याच्या शिक्षण विभागान आराखडा तयार केला असून या बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रात काल कोरोनाचे 11 हजार 877 नवीन रुग्ण आढळले, त्यातील 8 हजार 63 रुग्ण मुंबईत आढळून आले. कोविड- 19 च्या 9 रुग्णांच्या मृत्यूची काल नोंद झाली, तर 2 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात काल ओमीक्रॉनचा संसर्ग झालेल्या 50 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 510 ओमीक्रॉनबाधित आढळले असून, 193 रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.