आता अजितदादांच्या शब्दालाच राष्ट्रवादीत किंमत उरली नाही ?

लातूर – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत एकामागून एक अनेक नवीन आणि कठोर नियम केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन व्हावे यासाठी सक्ती केली जात असताना राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) सुद्धा राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे सतत आवाहन करत आहेत. त्यांच्या या आवाहनाचे अनेक व्हिडीओ आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. लातूरमध्ये आयोजित डान्स स्पर्धेत कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने लातूरमधील दयानंद सभागृहात डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कोरोना बाबतच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेलं दयानंद सभागृह खचाखच भरलं असून या कार्यक्रमादरम्यान स्पर्धक युवक युवतींसह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते डान्स करत जल्लोष करत आहेत. परंतु, या जल्लोषादरम्यान स्पर्धकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्कच नसल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत आहे.

या सर्व प्रकारानंतर  राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना अशा गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असे सवाल विचारले जात आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे आता अजितदादांच्या शब्दालाच राष्ट्रवादीत किंमत उरली नाही का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.