‘मी जय भीमवाली पोरगी, इज्जतीला घाबरते, पण…’, ब्रेस्ट दाबणाऱ्या साजिदचा अभिनेत्री जयश्रीने केला भांडाफोड

Mumbai: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सध्या सलमान खान (Salman Khan) याच्या बिग बॉस शोमुळे (Big Boss) चर्चेत आले. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या साजिदवर एका-नंतर-एक अभिनेत्री गंभीर आरोप करताना दिसत आहेत. नुकताच आणखी एक मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (Jayashree Gaikwad) त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर आणखी एका मुलाखतीत तिने ८ वर्षांपूर्वी आपल्यावर ओढावलेला गंभीर प्रसंग सांगितला.

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जयश्री म्हणाली, “मी सिनेमा इंडस्ट्रीत नवी होती. फार लोकांशी माझ्या ओळखी नव्हत्या. एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. ती पार्टी जुहूमध्ये होती. मी त्यावेळी त्यांच्यासोबत गेले. तेव्हा तिथे मला त्यांनी साजिद खानशी ओळख करुन दिली. आमचं बोलणं झालं. कामासंदर्भात मी इथे काही बोलू शकत नाही. तू माझ्या ऑफिसला ये, असं त्याने मला सांगितलं. मलाही काम हवं असल्याने मी दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचले.”

“मला दरवाजात पाहताच तो ताडकन उभा राहिला. मला घट्ट मिठी मारली. त्याचवेळी त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला. सर तुम्ही हे काय करताय, असं मी त्याला विचारलं तर एवढं तर चालतं ना.. असं म्हणून पुढे नाही नाही ते अश्लिल बोलू लागला. तुला काम हवंय.. प्रमुख भूमिका तर लगेच मिळणार नाही. तुझ्यासाठी मी प्रयत्न करेन. पण त्याबदल्यात मला काय मिळेल? असा प्रश्न त्याने मला केला.”

“यादरम्यानच्या संभाषणात त्याने नको नको ते प्रश्न विचारले. जेव्हा त्याने ब्रेस्ट दाबले अन् पँटमध्ये हात टाकला, तेव्हा इथून कधी मी बाहेर पडते असं मला झालं होतं. साधारण अर्ध्या तासाच्या संभाषणानंतर मी निघते, असं सांगून मी ऑफिसबाहेर पडले. मी जर तिथून निसटले नसते तर माझ्यावर अतिप्रसंग झाला असता”, असे खळबळजनक आरोप करत अभिनेत्री जयश्रीने आपल्यावर ओढावलेली आपबिती सांगितली.

मी जय भीमवाली पोरगी..
घडलेल्या प्रसंगाने मी दु:खी होते. माझं मन मोकळं करण्यासाठी मी माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्यावर ओढावलेली आपबिती सांगितली. मात्र आमच्याजवळ तू हे सगळं सांगितलं, दुसरं कुणाकडे काही सांगू नको. आपण पडलो छोटे, तो साजिद खान आहे. तू कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपलं काही चालणार नाही, यापेक्षा तू कुणाकडे काही बोलू नको. एकतर शांत बस्स आणि बोलायचं असेल तर इंडस्ट्री सोडून दे. असं सांगून मला माझ्या मित्र मैत्रिणींनी त्यांच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला.

घरुनही पाठिंबा नव्हता. त्यामुळे मी बोलू शकत नव्हते. त्यावेळी मी इंडस्ट्रीत नवी असल्याने काय करु? काय पाऊल उचलू हे कळत नव्हतं. पण माझ्या मनात एवढं होतं की एक दिवस याचा भांडाफोड करायचा, याच्याविरोधात आपण बोलायचं. आणि आज तो दिवस आलाय. असं सांगून ८ वर्षांपूर्वीचा प्रसंग जयश्रीने ‘नवभारत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

दरम्यान दहापेक्षा अधिक अभिनेत्रींनी साजिद खानवर आरोप केले आहेत. यात डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.