‘विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार हे सबंध देश जाणतो’ 

Mumbai – २०१९ साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार (MVA ) होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.”असं ते म्हणाले आहेत.

शरद पवारांचा पलटवार 

दरम्यान, या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा शरद पवार हे चर्चेत आले आहेत. या आरोपांवर स्वतः त्यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली. “मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, आता या मुद्द्यावर पवारांनी भाष्य केल्यानंतर भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी भाष्य केले आहे.ते म्हणाले,  ‘विश्वासघाताचे’ दुसरे नाव म्हणजे ‘शरद पवार’  हे सबंध देश जाणतो आणि शरद पवार, तुम्ही ‘सत्य-असत्य’ बद्दल बोलणं म्हणजे निव्वळ हास्यास्पदच आहे असं भोसले यांनी म्हटले आहे.