आरोग्य खात्यानंतर आता म्हाडाच्या परीक्षा ढकलल्या ऐनवेळी पुढे…

मुंबई : म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

हे देखील पहा