रश्मी ठाकरेंनी ठाण्याबाहेरच्या लोकांना घेऊन जाऊन ठाण्यात शक्तीप्रदर्शन केलं ? 

ठाणे – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात होत्या. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या देवीचं दर्शन रश्मी ठाकरेंनी घेतलं. त्याचप्रमाणे पूजाअर्चा आणि आरतीही केली. ठाण्यात आल्यानंतर रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. रश्मी ठाकरे या ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक आणि महिला नेत्या एकवटल्या होत्या. दरम्यान, या शक्ती प्रदर्शनाची चर्चा होत असताना शिंदे गटाने मात्र एक खळबळजनक दावा केला आहे.

शिंदे गटाच्या ठाणे महिला संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाणे भेटीवर तोंडसुख घेतलं आहे. रश्मी ठाकरे आल्या तेव्हा जमलेली गर्दी मुंबईबाहेरून आणली होती, असा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, काल आम्ही म्हणालो होतो की रश्मी वहिनी आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण आम्हाला कळलं की ठाण्यातल्या महिला आघाडीपैकी कुणीच त्यांच्यासोबत नाही. म्हणून मुंबईबाहेरून त्यांना गर्दी मागवावी लागली. दुपारी तीन वाजल्यापासून ठाण्याकडे बसेस रवाना करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, असं शिंदे म्हणाल्या.

देवीचे मंदिर हे काही शक्तीप्रदर्शन करण्याचं स्थान नाही. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे वेळ दिली आहे. तेव्हा जर शक्तीप्रदर्शन केलं तर ते चालू शकेल. इथे शक्तीप्रदर्शन करून कोणतंही चिन्ह मिळणार नाही. कारण देवीच्या हातात धनुष्यबाण नाहीये, त्रिशूळ आहे. त्यामुळे इथे येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नव्हती”, असं त्या म्हणाल्या.