पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISIS मध्ये भरती करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला अटक

Pune – राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार (Dr. Adnan Ali Sarkar) याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि इसीसशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. हा आरोपी दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनआयएनं या आधी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून चौघांना अटक केली आहे.

दहशतवाद विरोधी पथकानेही बुधवारी पुण्यातील कोंढवा परिसरात; दहशतवाद्यांना आश्रय देण्यास मदत केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. पुणे पोलीस दलातील कोथरुड पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं होतं. या प्रकरणातच पुणे एटीएसनं अब्दुल कादीर दस्तगीर याला अटक केली असून त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश वी आर कचरे यांनी काल दिले.