राहुल गांधींच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.