Sunil Tatkare | तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळेच आता माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणार

Sunil Tatkare | निवडणूका येतात जातात मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी एटीएमसारखे २४ तास उपलब्ध असतो. ते आमचे कर्तव्य आहे आहे कारण तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे त्यामुळेच माझ्या जीवात जीव असेपर्यंत जनतेचे काम करत राहणार आहे असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हसळा येथील अल्पसंख्याक मेळाव्यात दिला.

मी माझे वडील गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा रडलो. त्यानंतर श्रीवर्धन आणि परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी डोळ्याला डोळा लागला नाही. अनिकेत, अदिती आम्ही कसातरी मार्ग काढून पोचलो आणि जे नुकसानीचे दृश्य पाहिले ते बघून माझे अश्रू थांबत नव्हते… हा घडलेला प्रसंग सांगताना सुनिल तटकरे यांना एक क्षणभर गहिवरून आले.

समाजासमाजामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु आजही माझा अल्पसंख्याक समाज माझ्यासोबत आहे. कारण या समाजासोबत माझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध चांगले राहिले आहेत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

१९८०-९० दशकात कोकणाला विकासात्मक न्याय मिळाला नव्हता परंतु बॅरिस्टर अंतुले यांच्यामुळे खरा न्याय कोकणाला मिळाला. दूरदृष्टी ठेवून बॅरिस्टर अंतुले यांनी कोकणासाठी काम केले. त्यांच्यासारखा सेक्युलर नेता मी आजवर पाहिला नाही असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

सेक्यूलर विचार आम्ही कधी सोडले नाही आणि सोडणार नाही असे सांगतानाच आम्ही भाजपात गेलो अशी ओरड विरोधक करत आहे मात्र आम्ही भाजपच्या मंत्रीमंडळात गेलो आहोत. सत्तेतून जनतेचा विश्वास आणि विकास घेऊन काम करण्यासाठी गेल्याचे सांगून अशा अनेक वेगवेगळ्या आघाड्या देशाच्या राजकारणात तयार झाल्याचे सुनिल तटकरे यांनी उदाहरणासहीत सांगितले.

मी ऊर्जा मंत्री असताना जो काही कालावधी मिळाला त्या कालावधीत राज्याला भारनियमनमुक्त केले होते मात्र अनंत गीते यांनी दोनवेळा मंत्री असताना एक तरी काम केलेले दाखवा असा सवाल केला आणि बॅरिस्टर अंतुले यांना मंत्रीपद मिळाले त्यावेळी त्यांनी ‘पल्स पोलिओ’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू करणारे पहिले मंत्री अंतुले होते हेही सुनिल तटकरे यांनी अनंत गीते यांना ठणकावून सांगितले.

प्रत्येकाच्या राजकीय भूमिका असू शकतात पण जसे कुराणात सांगितले आहे तसे भगवदगीतेतही माणूसकीचा विचार ठेवावा तुझे कर्म तू कर असे सांगितले आहे याची आठवण सुनिल तटकरे यांनी विरोधकांना करुन दिली.

१४० कोटी रुपयांचा निधी युनानी महाविद्यालयाला देत २४ तासात मंजुरी मिळाली आहे. अल्पसंख्याक विभागाला निधी देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले आहे. हे सरकार आल्यावर अल्पसंख्याक समाजासाठी अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका