चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे; कॉंग्रेसचा आरोप

मुंबई –  केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा  सोनिया गांधी आणि नेते  राहुल  गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुलजी गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुलजी गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा व आंदोलन करून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जीपीओपासून ईडी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. तर राहुल गांधींच्या समर्थनासाठी व मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या तृतीयपंथी सेलच्या अध्यक्ष पवन यादव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील नरिमन पाईंट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करत लातूर, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, अमरावती, नागपूर, नाशिक, पनवेल, रायगड, अलिबाग, चंद्रपूर, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, संगमनेरसह सर्व जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले. प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे. आ. कुणाल पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, खा. बाळू धानोरकर, आ. सुधीर तांबे, आ. ऋतुराज पाटील, आ. धिरज देशमुख यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात सलग पाच दिवस काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीपासून सर्व राज्यातही आंदोलन सुरु असून केंद्र सरकारची ही दडपशाही थांबली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.