‘…तर रविंद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार’

Pune – अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मतदारांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटले असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकरांनी केलेल्या या आरोपामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

परंतु आता धंगेकरांच्या याच आरोपांविरोधात पुण्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असल्याची पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ॲड. मोनिका खलाने यांनी तर थेट हे आरोप बिनबुडाचे आहेत धंगेकरांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असं सांगितल्याने आता धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बिनबुड्याचे जे पैसे वाटपाचे आरोप केले आहेत ते चुकीचे असून माझी धंगेकरांना विनंती आहे , कि त्यांनी पुराव्यासहित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी अन्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी कारण हे सर्व आरोप खोटे असून फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात येत आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसत असून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. परंतु जर २ दिवसात त्यांनी पुरावे सादर नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ॲड. खलाने यांनी दिला आहे.