अमोल कोल्हे यांचे सिनेमामध्ये नथुरामची भूमिका करण्याचे समर्थन करतो – असीम सरोदे

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेली पोस्ट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, डॉ अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका केली हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. एक कलाकार म्हणून कोणती भूमिका करायची किंवा नाकारायची हे ठरविण्याचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य घटक आहे. मी त्यामुळेच अमोल कोल्हे यांच्या “व्हाय आय किल्ड गांधी” या सिनेमामध्ये नथुरामची भूमिका करण्याचे समर्थन करतो. खासदार अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करणे टाळणे सहज शक्य होते, तसे त्यांनी केले नाही. त्यामुळेच त्यांचे मुळातील विचार किंवा त्यांच्या विचारांचे आधार काय हे तपासणे, त्यांच्या यापूर्वीच्या वागणुकीचे, बोलण्याचे विश्लेषण करण्यातून महत्वाचे निष्कर्ष निघू शकतात. एक कलाकार नथुराम ची भूमिका करून विषारी झाला आहेच.

त्याला नथुराम म्हणून बघायला आता कुणी येणार नाही म्हणून मग एक वेगळा नथुराम तयार करायची आयडिया बरीच विचारांती घेतलेली राजकीय खेळी वाटावी अशी आहे. पोंक्षेचा नथुराम बघणारे विशिष्ट विद्वेषी विचारांचे वाहक होतेच व ते अनेकजण विशिष्ट पक्षाचे पक्के मतदार सुद्धा आहेत. पण आता नवीन प्रवर्गातील काही प्रेक्षक डॉ कोल्हेंचा नथुराम बघायला येतील व महात्मा गांधींच्या बद्दल गैरसमज पारविण्याच्या मोहिमेच्या जाळ्यात आणखी काही नवीन लोक अडकतील असे गणित यामागे असेल. असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.