‘समग्र महाराष्ट्राची राजधानी असलेली मंबई कुणाच्या बापाची मालगुजारी नाही’

नागपूर : केवळ प्रसिद्धीच्या हव्यासातून उठसुठ काहीही बरडणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेली धमकी निषेधार्ह आहे. समग्र महाराष्ट्राची राजधानी असलेली मंबई कुणाच्या बापाची मालगुजारी नाही, असा सज्जड इशारा भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला.

दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही’ अशी धमकी देणाऱ्या राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाचार घेतला.

हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. मात्र राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. सत्तेत असलेल्या पक्षाचा एक खासदार जाहिररित्या जर अशा पद्धतीने धमकी देत असेल तर महाराष्ट्रातील कोणताही सुज्ञ नागरिक ते खपवून घेणार नाही, असाही इशारा भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिला.

राज्यात महाविकास आघाडी सरकारतर्फे सर्वत्र वसुली धोरण सुरू आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख कारागृहात आहेत. कारागृहात देशमुखांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेतले जाते. हा सर्व प्रकार महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरण स्पष्ट करणारे आहे. एकूणच हे राज्य कायद्याचे नसून वसुलीचे राज्य आहे, असा टोलाही ॲड.मेश्राम यांनी लगावला.

राज्यात सत्ता काबिज केल्यापासून फक्त एक अधिवेशन नागपुरात झाले. महाराष्ट्र म्हणजे मुंबई एवढीच समजूत बाळगणारे महाविकास आघाडी सरकार नागपूरात येऊन विदर्भाच्या प्रश्नांवर बोलायची हिंमत करीत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर घेण्याचे जाहिर केल्यानंतर ते पुन्हा मुंबईतच घेण्याचा घाट घातला जातो. आणि त्यांच्याच पक्षाचा खासदार जो केवळ प्रसिद्धीसाठी उठसुठ पत्रकार परिषद घेतो तो नागपुरात जाऊ देणार नाही, अशी धमकी देतो. खासदार संजय राऊतांनी मुंबईतून नागपूरात जाऊ न देण्याची धमकी देण्याऐवजी मुंबईत घरात बसून असलेल्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांना नागपूर आणि विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचाही सल्ला द्यावा, असाही टोला ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.