‘अमृता फडणविसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय’

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमृता फडणीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत (Mumbai Traffic) एक वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय.

मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केला. मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते, असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.