रहस्य : ‘या’ तलावातील बेट तरंगत असून ते सतत आपली जागा बदलत असते ?

विनीत वर्तक -हिमाचल प्रदेश (Himachal) आठवलं की नेहमीच तीन ठिकाणांची नाव आपण पटकन घेतो. सिमला, कुलू, मनाली म्हंटल कि आपण देवभूमी बघून आल्याचा भास अनेकांना होतो. पण ह्या हिमाचल प्रदेश ला देवभूमी करणारी अनेक ठिकाण ह्या प्रदेशात आहेत. काही ज्ञात तर काही अज्ञात. सिमला-मनाली ची केलेली हालत बघून तरी अशी ठिकाण अज्ञात रहावीत असच मनापासून वाटते. ह्यातल एक अज्ञात पण खूप रहस्यमय असणार एक ठिकाण म्हणजे पराशर तलाव.

पराशर तलाव (Parashar lake) हा मंडी ह्या मनाली ला जाताना लागणाऱ्या ठिकाणापासून ४९ किमी लांब आहे. समुद्रसपाटी पासून २७३० मीटर उंचीवर असलेला हा तलाव जितका सुंदर आहे त्याहीपेक्षा खूप रहस्यमयी आहे. ह्याच नाव पराशर ऋषी च्या नावावरून ठेवण्यात आल आहे. अस म्हंटल जाते कि इकडे पराशर ऋषी नी खूप तपश्चर्या केली होती. पराशर ऋषी हे वशिष्ठ ऋषींचे नातवंड तर वेद-व्यास ऋषींचे वडील होते. पराशर ऋषींनी पहिल पुराण म्हणजेच विष्णू पुराणाची रचना केली होती. जेव्हा पांडव महाभारत संपवून परतत होते तेव्हा देव कमुरनाग ह्यांच्यासाठी चांगली जागा शोधत असताना पराशर तलावाची जागा त्यांना आवडली. देव कमुरनाग ह्यांनी तिकडेच वास्तव्य करण्याच निश्चित केल. त्यांच्या सांगण्यावरून पांडवातील भीमाने आपल कोपर ह्या ठिकाणी जमिनीत खुपसलं. ह्यामुळे इकडे अंडाकृती आकाराचा हा तलाव ज्याला पराशर तलाव अस म्हंटल जाते त्याची निर्मिती झाली.

या तलावाच सगळ्यात मोठ रहस्य म्हणजे ह्या तलावात असणार तरंगत बेट. ह्या तलावात गोल आकाराच एक बेट तरंगत असून ते सतत आपली जागा बदलत असते. आज ज्या ठिकाणी आपल्याला बेट दिसेल तेच एक आठवडा अथवा महिन्यानी आल्यावर त्याची जागा पूर्णतः बदलेली असते. हे बेट त्या पाण्यात कस तरंगते ह्याबद्दल अजूनही उत्तर विज्ञानाच्या कक्षेत शोधण्यात यश आलेल नाही. पराशर तलाव पृथ्वीच्या विज्ञानाच प्रतिनिधित्व करतो अस म्हंटल जाते. या तलावात जे पाणी आहे ते ७१% टक्के जागा व्यापत तर त्यात तरंगत असलेल बेट हे २९% जागा व्यापत. पृथ्वी वरील जमीन आणि पाण्याच तुलनात्मक टक्के प्रमाण इतकच येत. या तलावातील जे बेट आहे ते स्वतःभोवती पण फिरते आणि ऋतू नुसार तलावाच्या भोवती पण फिरते. बेटाला पृथ्वी मानल तर पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरताना तिच्यावरील ऋतू बदलतात एकदम तश्याप्रकारे ह्या बेटाच ह्या तलावात विहार सुरु असतो. अनेक अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मते ह्या बेटाच ह्या तलावात एका विशिष्ठ पद्धतीनेच भ्रमण होते आहे ज्याच्यावर अजूनही अभ्यास होण्याची गरज आहे. अस म्हंटल जाते कि जेव्हा हे बेट तलावाच्या अगदी उत्तरेला येऊन टेकते तेव्हा वाईट घटना घडतात. ह्यामागच खर खोट आपण बाजूला ठेवल तरी एकूणच ह्या जमीनीच पाण्यात तरंगण तसेच त्याचा त्या तलावामधला विहार ह्या खरोखर विज्ञानाच्या कक्षेतून अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. ज्याची उत्तर अजूनतरी विज्ञानाला मिळालेली नाहीत.

ह्याहून रहस्यमय आहे तो हा तलाव. इतक्या उंचीवर एका डोंगराच्या टोकाशी ह्या तलावात पाण्याचा स्त्रोत कुठून आहे हे अजून उमगलेल नाही. उन असो वा थंडी ह्या तलावाच्या पाण्याच्या साठ्यात गेल्या शेकडो वर्षात काहीच फरक पडलेला नाही. ना उन्हाळ्यात हा तलाव आटत ना पावसाळ्यात हा ओथंबून वाहतो. त्याच्या पाण्याच्या पातळीत कोणताच फरक पडत नाही. ह्यामुळे ह्या तलावाच्या पाण्याची खोली किती असावी ह्यासाठी अनेक संशोधन झाल. काही वर्षापूर्वी काही जर्मन संशोधकांनी अत्याधुनिक यंत्र आणि पाणबुड्यांच्या मदतीने ह्या तलावाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ह्या तलावाची खोली सांगता आली नाही. शेवटी त्यांनी या तलावाची खोली मोजण्याचा नाद सोडून दिला. ह्या नंतर शासनाने या रहस्यमयी तलावाच्या खोली मोजण्याच्या प्रयत्नांना पूर्ण बंद केल आहे. त्यामुळे पराशर तलावाची खोली आजही अज्ञात आहे. ह्या तलावाच पूर्ण निळशार असणार पाणी प्रचंड औषधी गुणधर्माने ओतप्रोत आणि प्रदूषणापासून मुक्त आहे. या तलावाच्या आसपास एकही वृक्ष नसून प्रचंड गवत आहे. ह्या गवतातून पाणी वाहत येऊन ह्या तलावात मिसळत असते. ह्या तलावाच्या बाजुच गवत हि औषधी समजल जाते. अनेक लोक इकडून जाताना प्रसाद म्हणून इथल थोड गवत घेऊन जातात.

या तलावाच्या बाजूला १३ व्या शतकात राजा बाण सेन ह्याने बांधलेल पराशर ऋषींच एक सुंदर मंदिर असून हे मंदिर ह्या तलावाच्या बाजूला असणाऱ्या एकमेव झाडाच्या खोडापासून बांधलेल आहे अस म्हंटल जाते. ह्या मंदिराची रचना खूप सुंदर आहे. लोकांपासून लांब आणि अनेक रहस्यमयी आणि अदभूत गोष्टीनी भरलेला हा परिसर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. प्रचंड शांतता आणि आपल वेगळपण आजवर टिकवून ठेवणारा हा परिसर आयुष्यात एकदा तरी त्याच निस्पृह भावनेने बघावा. इकडे आता रस्ते करून आणि हॉटेल काढून ह्या स्वर्गाची वाट लावली नाही म्हणजे कमावल. नाहीतर शेकडो वर्ष आपल वेगळेपण जपणारा हा पराशर तलाव उद्या बोटिंग राईड बनवायला आपण सो कॉल्ड पुढारलेली पिढी पुढे मागे बघणार नाहीत.

तळटीप :- ही पोस्ट जवळपास ५ वर्ष जुनी आहे. त्यामुळे लिहलेल्या काही गोष्टी विज्ञानाच्या तराजूत अयोग्य वाटू शकतात. पण श्रद्धेच्या अनुषंगाने मी त्या या पोस्ट मधे मांडलेल्या आहेत. यातून कुठेही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा माझा विचार अथवा प्रयत्न नाही.
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.