देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे; लालूप्रसाद यादव यांची मागणी 

नवी दिल्ली –  देशभरातील दहशतवादी कारवायांमध्ये पीएफआयच्या सतत सक्रियतेचे पुरावे मिळाल्यानंतर केंद्र सरकारने त्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी उशिरा एक अधिसूचना जारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. पॉप्युलर फ्रंट इंडिया या वादग्रस्त संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी पीएफआयविरोधात एनआयएने देशभरात छापे टाकले असून यामध्ये शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे.

PFI विरुद्ध NIA चा पहिला धाड 22 सप्टेंबरला आणि दुसरी फेरी 27 सप्टेंबरला पडली. पहिल्या फेरीत 106 PFI सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी, 27 सप्टेंबर रोजी 247 लोकांना अटक / ताब्यात घेण्यात आले. एनआयएसह इतर तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात पुरावे सापडले आहेत, त्यानंतर गृह मंत्रालयाकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्याच वेळी, आता गृह मंत्रालयाने पीएफआयवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले की, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. संघावर आधीदेखील बंदी घालण्यात आली होती. पीएफआय, संघासारख्या इतर संघटनांवर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

हिंदू-मुस्लिम करून दुफळी माजवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदू-मुस्लिम करून तणाव करणे, मशिदींवर भगवा झेंडा लावणे या चुकीच्या गोष्टी आहेत. देशात सांप्रदायिकता वाढवून दंगल घडवणे आणि सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.