मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 18 पैकी 6 मंत्र्यांनी मारल्या आहेत या पक्षातून त्या पक्षात उड्या

Mumbai – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

दरम्यान, शपथ घेतलेले अनेक नेते हे विविध पक्षातून फिरून आलेले आहेत. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. याशिवाय दीपक केसरकर यांचाही काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना आणि आता फुटीर शिंदे गटात असा प्रवास झाला आहे.

उदय सामंत (Uday Samant) यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते शिंदे गटात आहेत. याशिवाय अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषवले होते. आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

तानाजी सावंत हे 2015 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता आता ते शिंदे गटात आहे. विजयकुमार गावित 1995 मध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2000 ते 2014 सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 2014 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 2019 च्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाल्यानंतर यंदाच्या शिंदे गटातून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.