‘माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावणे; ही पिंपरी-चिंचवडची संस्कृती नाही’

पिंपरी – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावल्याची घटना घडली. ही बाब पिंपरी-चिंचवडची संस्कृती नाही. विरोधकांनी पातळी सोडली आहे. पिंपरी-चिंचवडकर अशी मुजोरी कदापि सहन करणार नाहीत, अशी टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. पिंपरी-चिंचवडमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

दरम्यान, फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. शाहूनगर येथील उद्यान उद्घाटन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात गैर काहीच नाही. मात्र, राज्यातील एखाद्या सन्माननीय व्यक्तींच्या दौऱ्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या संस्कृतीला काळीमा फासला जाईल, असे कृत्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहीत केलेल्या व्यक्तीने केले. ही बाब पिंपरी-चिंचवडमधील सूज्ञ जनता विसरणार नाही. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे, असेही ढाके यांनी म्हटले आहे.

नामदेव ढाके म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोचे लोकार्पण झाले. भूमिपूजन आणि लोकार्पण निर्धारित वेळेत केल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते. भाजपाने कुणाचाही अनादर केला नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अल्पसंतुष्ट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आंदोलन केले. काळे झेंडे दाखवले. तसेच, सुसंस्कृत पिंपरी-चिंचवडकरांना लाजवेल, अशी कृती करीत फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावली. याचा समाचार पिंपरी-चिंचवडकर आगामी निवडणुकीत निश्चितपणे घेतील, अशी टीकाही ढाके यांनी केली.