‘हिंदू संघटनांच्या नावाखाली काही लोक जाणीवपूर्वक विखार पसरवत आहेत पण फडणवीसांना ते दिसत नाही’

मुंबई – महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole)  यांनी केली आहे.

अलंकापुरीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी(Saint Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi)  प्रस्थान सोहळा होत असताना पोलिसांनी वारकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. पटोले म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. या राज्यात दररोज गुन्हे घडत आहेत पण गृहमंत्रीपदावरील व्यक्तीला त्याची जरीही चाड नाही. वारकऱ्यांवरील लाठीहल्ला हा शांततेने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भक्तांचा व विठुरायाचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे. असा प्रकार होऊच कसा शकतो? वर्षानुवर्षे चालत असलेल्या या पंरपरेला गालबोट लावण्याचे पाप करण्याचे धाडस पोलीस कसे काय करु शकतात? पोलीसांना कोणी अधिकार दिला वारकऱ्यांवर लाठीमार करण्याचा? पोलीस कोण आहेत वारकऱ्यांच्या हक्कात बाधा आणणारे ? वारीचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास झाले आहेत तरीही त्यांना खुर्ची सोडवत नाही पण त्यांच्या खुर्चीच्या मोहात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे.

मागील तीन महिन्यात १० ठिकाणी दंगली झाल्या. हिंदू संघटनांच्या नावाखाली काही लोक जाणीवपूर्वक विखार पसरवत आहेत पण शिंदे सरकार व या सरकारमधील गृहमंत्री फडणवीसांना ते दिसत नाही. शिंदे- फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करण्यात तत्पर आहेत. गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी यांच्यावर कारवाई करताना फडणवीसांच्या हाताला लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.

विरोधी पक्षाने राज्यातील एखादा गंभीर मुद्दा उपस्थित केला तार त्याची खिल्ली उडवणे एवढेच गृहमंत्री फडणवीस यांचे काम आहे. फडणवीस यांना पोलीस दलातील अधिकारी जुमानत नाहीत असे दिसते. अशा गृहमंत्र्यांनी पदावर राहणे महाराष्ट्रासाठी गंभीर आहे. वारकरी बांधवांवर केलेला पोलीस लाठीहल्ला हा महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. हे सरकार केवळ बोलघेडवण्याचे आहे, कृती यांच्याहातून होतच नाही. महाराष्ट्रातील या बेकायदेशीर पापी सरकारला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असेही पटोले म्हणाले.