आयपीएलच्या कोट्यवधी रुपयांपेक्षा देश जास्त महत्त्वाचा; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या वक्तव्याने शरमेने खाली झुकेल भारतीयांची मान!

सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक, मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) स्वत:ला आयपीएलसह फ्रँचायझी क्रिकेटपासून दूर ठेवले आहे आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. स्टार्कसाठी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळणे सर्वांत महत्त्वाचे आहे आणि भविष्यात युवा क्रिकेटपटू असाच विचार करतील अशी त्याला आशा आहे. स्टार्कचे अनेक सहकारी आयपीएल (Mitchell Starc On IPL), बिग बॅशसह जगातील आघाडीच्या टी-२० लीगमध्ये खेळत आहेत पण स्टार्क या मोहापासून दूर राहिला आहे.

आयपीएल २०२३ च्या हंगामातही स्टार्क सहभागी झाला नाही. त्याच्यासह ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील बरेचसे सहकारी आयपीएलमधून माघार घेत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत होते. त्याचे फळही त्यांना मिळाले आहे. केनिंग्टन ओव्हल येथे भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २०९ धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकत कसोटी विश्वविजेतेपद पटकावले आहे.

मिचेल स्टार्क म्हणाला, “मी आयपीएलचा आनंद लुटला आणि यॉर्कशायरसाठी काऊंटी क्रिकेटही खेळलो. पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणे ही माझी प्राथमिकता आहे. मला त्याची खंत नाही. पैसा येईल आणि जाईल पण माझ्या वाट्याला आलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. कसोटी क्रिकेट शंभर वर्षांहून अधिक काळापासून खेळले जात आहे आणि ऑस्ट्रेलियासाठी ५०० पेक्षा कमी पुरुष खेळाडू खेळले आहेत ज्यामुळे ते स्वतःमध्ये खास बनते.” स्टार्क २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळला होता.

“मला पुन्हा आयपीएल खेळायला आवडेल, पण ऑस्ट्रेलियासाठी चांगले खेळणे हे माझे दीर्घकालीन ध्येय आहे, मग तो कोणताही फॉरमॅट असो,” असे म्हणत स्टार्कने त्याचे देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.