पृथ्वीराज चव्हाण यांचं पक्षात १ नंबरचं स्थान आहे, पण तुमचं…; शरद पवारांना नाना पटोलेंच प्रत्युत्तर

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या कालच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं होतं. यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखीलराष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी कर्नाटकमध्ये बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी चालू असल्याचं म्हंटलं होतं. या संपूर्ण घटनांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

“पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी आहे की डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार”, असा खोचक टोला शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.

यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी साताऱ्यात बोलताना शरद पवारांवर पलटवार केला आहे. “हाच सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना विचारल्यावर प्रश्न उपस्थित होईल,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांचं पक्षात १ नंबरचं स्थान आहे. शेवटपर्यंत १ नंबरच असेल. पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते होते आणि राहतील. भाजपाच्या तानाशाहीविरुद्ध लढण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाणांमध्ये आहे. याचा आम्हाला स्वाभिमान आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.