पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोर्ट रूममधून अटक, पण कारण काय?

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांना पाक रेंजर्सनी कोर्ट रूममधूनच अटक केली आहे. इम्रान खान यांची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा त्यांनी अलीकडेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मेजर जनरल फैसल नसीर आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानी लष्कराने त्यांना खडसावले होते.

पाकिस्तानी मीडियानुसार, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर रेंजर्सनी अटक केली. इम्रान खान आपल्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन घेण्यासाठी येथे आले होते. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोर्टाच्या आवारात इम्रान खान यांचे वकील गंभीर जखमी झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.