कठीण काळात मदत करणाऱ्या मनसेवर शिंदे गट उलटला; मनसेला पाडले खिंडार

पनवेल – नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे (MNS leaders in Shinde group) गटात प्रवेश केला आहे.  या घडामोडींमुळे कठीण काळात मदत करणाऱ्या मनसेवर शिंदे गट उलटला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बहुमत चाचणी वेळी मनसेने शिंदे सरकारला पाठींबा देवूनही हे खिंडार पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पनवेल आणि उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. रात्री उशीरा मुंबईमधील मलबार हिल येथील शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात हा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब हेदेखील शिंदे गटात दाखल झाले.

उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाल्याचं चित्र आहे. नवी मुंबईत मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या अतुल भगत यांनी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला. अतुल भगत यांच्यासोबत नवी मुंबईतील उप तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत.