‘शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार, लोकसभेत तीन ते चार जागा येतील की नाही, याची शाश्वती नाही’

नाशिक– ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे. दरम्यान, शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी  दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांनी व्यक्त केलीय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

आठवले म्हणाले की, 4 राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाला. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले. त्यांनी केलेल्या विकासकामामुळे यूपीमध्ये भाजपचा विजय झाला. ही निवडणूक 2024 च्या लोकभेची चाचणी होती. आता दोन वर्षांनी भाजपला 400च्या वर जागा मिळतील असा दावाही आठवले यांनी केला.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे. काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. मात्र, काँग्रेसमध्ये एकही सक्रिय नेता नाही. आता काँग्रेसला भवितव्य नाही. शिवसेनेची अवस्थासुद्धा काँग्रेससारखी दयनीय होणार आहे. लोकसभेत तीन ते चार जागा येतील की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावे. याबद्दल खासदार संजय राऊत भेटले, तर त्यांना सूचना करत असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.