‘काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…’; मलिकांची खोचक टीका

मुंबई  – बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवसाने सरकार पडत नाही किंवा बनत नाही. सुरुवातीला भविष्यवाणीने सरकार पाडत होते आता नवसाने पाडण्याचा प्रयत्न होतोय परंतु या भ्रमात राहू नये असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला दिला आहे.

काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय… अशा आशयाचे ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या मनसुब्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले शेवटी त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे अशी टिकाही नवाब मलिक यांनी केली.

२३ वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतंय असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

आमचे आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर २५ वर्षासाठी टिकेल असे जाहीर केले याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे.

भाजपचे जुने नेते आता थकले आहेत आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही असा जबरदस्त टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

You May Also Like