नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये… लढत राहू आणि जिंकू – संजय राऊत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दाऊद सोबत मलिक यांचे नाव आलेले असताना शिवसेना चक्क मलिक यांचा बचाव करताना दिसून येत आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नवाब मलिक यांच्याबाजूने मैदानात उतरले आहेत. ते म्हणाले, महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे.. असं राऊत यांनी म्हटले आहे.