मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील (masjid) बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली.

याद्वारे शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर लाउडस्पीकर जप्त केले आहेत. त्याचबरोबर, मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे असून पोलिस स्थानकात नेण्यात आलं आहे.

शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep deshpande) यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.